ऊस शेती

उसावरील खोड आणि कांडी किडीचा प्रादुर्भाव

खोड किडीचा प्रादुर्भाव ऊस लागणीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत आढळून येतो. अळी उसात शिरून उगवणाऱ्या कोंबाला सात ते आठ दिवसांत खाऊन टाकते. कांडी कीड ही कांडीला अनेक छिद्रे करते. या किडीमुळे उसाच्या कांड्या आखूड व बारीक होतात. या दोन्ही किडींच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान लक्षात घेता वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. 

उसावरील किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात सरासरी 15 ते 20 टक्के तर साखर उताऱ्यात 2.30 ते 2.09 टक्के घट होते. उसावरील कांडी कीड व खोड कीड त्यापैकीच प्रमुख किडी असून, कांडीकिडीमुळे 35 टक्के व खोडकिडीमुळे 33 टक्‍क्‍यांपर्यंत ऊस उत्पादनात तर 2.9 ते 3.0 टक्के व 1 ते 1.5 टक्का अनुक्रमे साखर उताऱ्यात घट होते. 
खोड पोखरणारी अळी – 
खोड किडीचा प्रादुर्भाव ऊस लागणीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत आढळून येतो. अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली अळी रांगत अथवा चंदेरी धाग्याला लटकत उसाच्या खोडाजवळ येते. अळी खोडावरील मऊ पेशींवर उपजीविका करते. त्यानंतर अळी खोडाच्या आत शिरून उगवणाऱ्या कोंबाला आठ दिवसात खाऊन टाकते. त्यामुळे 12 ते 18 दिवसांत आपणास पोंगामर दिसते. सदरील पोंगा ओढल्यास सहज उपटून येता, त्याचा उग्र वास येतो. 
या किडीच्या अंडी, अळी व कोष या अवस्था वाढण्यासाठी कमीत कमी 12 अंश से. व जास्तीत जास्त 40 अंश से. तापमान व 50 टक्के आर्द्रता लागते. राज्यात या किडीचा प्रादुर्भाव आडसाली (जुलै-ऑगस्ट) ते सुरू (फेब्रुवारी) लागवडीपर्यंत आढळतो. शिफारशीत वेळेपेक्षा सुरू लागण जेवढी उशिरा होईल, त्याप्रमाणात या किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. उसाची लागण अरुंद ओळीत (90 सें.मी. पेक्षा कमी) या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. 
जीवनक्रम : 
अंडी : मादी पतंग हिरवीगार व टोकाकडे वाकलेल्या पानांवर अंडी देतात. या किडीची अंडी उसाच्या जमिनीलगतच्या तीन हिरव्या पानावरील मध्यशिरेजवळ आढळतात. नुकतीच दिलेली अंडी ही शुभ्र पांढरी असतात. साधारणपणे मादी पतंग पहिल्या सत्रात 400 अंडी काही पुंजक्‍यांच्या स्वरूपात देतात. नंतर दुसऱ्या रात्री 125 अंडी दोन-पाच पुंजक्‍यात देतात. या किडीची अंडी अवस्था तीन-सहा दिवस राहते. 
अळी : अंड्यातून बाहेर पडलेल्या अळीच्या अंगावर पाच नारंगी रंगाचे पट्टे असतात व ती अळी रात्रीच्या वेळी उसाच्या कोवळ्या पानांवर उपजीविका करते. परिणामी उसात पोंगामर आढळते. पूर्ण वाढ झालेली अळी कोषावस्थेत जाण्याअगोदर खोडाच्या आतून जमिनीच्या वरच्या भागावर चार ते दहा सें.मी. अंतरावर पतंगास बाहेर पडण्यासाठी छिद्रे तयार करून ठेवते व नंतर चंदेरी आवरणात पोंग्याच्या आत कोषावस्थेत जाते. अळी अवस्था 22-31 दिवस राहते. 
कोष : कोष खोडामध्ये (पोंग्यात) तयार होतात. कोष लांब, पिवळ्या ते तपकिरी रंगाचा दिसतो. ही अवस्था पाच-नऊ दिवस राहते. 
पतंग : या किडीचा पतंग शक्‍यतो सूर्योदयापूर्वी बाहेर पडतात. प्रौढ अवस्था पाच-नऊ दिवस जगते. 
यजमान वनस्पती : ज्वारी, ओट, भात, बाजरी, मका, राळा, गिन्नी गवत, बरू इ. 
नुकसान ः 
1) ऊस लागणीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. 
2) हलकी जमीन, कमी पाणी व जास्त तापमान, कमी आर्द्रता (40 ते 50 टक्के) या किडीच्या वाढीला पोषक आहे. 
3) उगवणीपासून कांडी तयार होण्यापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव आढळतो. 
4) तीन ते चार आठवडे वयाच्या उसात सुरळी मर किंवा पोंगामर आढळतो. 
5) या किडीचा प्रादुर्भाव फुटव्यावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. 
6) या किडीमुळे ऊस उशिरा तयार होतो. परिणामी, उत्पादनात (33 टक्के) व साखर उताऱ्यात (1 ते 1.5 टक्के) घट होते. 
7) या किडीमुळे नुकसान झालेले पीक विरळ दिसते. 
नियंत्रण : 
1) ऊस लागवडीपूर्वी दहा किलो फोरेट (दहा टक्के दाणेदार) किंवा 2.5 लिटर क्‍लोरपायरिफॉस (20 टक्के) प्रति 1000 लिटर पाण्यातून जमिनीत द्यावे. 
2) ऊस लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांनी तीन ते चार फुले ट्रायकोकार्ड प्रति हेक्‍टर या प्रमाणात साधारणत: 10 ते 15 दिवसांच्या अंतराने लावावीत. 
3) खोड कीडग्रस्त ऊस उपटून अळीसह नष्ट करावी. 
4) हेक्‍टरी 25 कामगंध सापळे शेतात लावावे. 
5) उसाला एक ते दीड महिन्यानंतर बाळ बांधणी केल्यास खोडकिडीचे पतंग बाहेर पडणारी छिद्रे बंद होण्यास मदत होईल व पतंग बाहेर पडणार नाहीत. 
6) उसामध्ये मका, ज्वारी व गहू ही आंतरपिके न घेता कांदा, लसूण, कोथिंबीर, पालक ही आंतरपिके घ्यावीत. 
7) ज्या जातीची वाढ जोमदार असते व ज्या जाती जास्त प्रमाणात फुटवे तयार करतात (को 957) त्या जातीवर या किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात येतो. 
8) पुरेशा प्रमाणात पालाशयुक्त खते वापरल्यास या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. 
9) हायमेनोप्टेरा व डिप्टेरा या कुळातील ऍपेन्टलिस (कोटेसिया) फ्लेविषेम, ट्रायकोग्रामा चिलोनिस, ब्रेकॉन व गोनिओझरा स्पे., ट्रॉचनिड इ. परोपजीवी/ मित्र कीटक यांचे नैसर्गिक नियंत्रण करतात. तसेच मुंग्यांच्या काही जाती या किडीची अंडी खातात. 
——————————————- 
कांडी अळीचा प्रादुर्भाव – 
कांडी कीड ही उसाच्या कांडीला अनेक छिद्रे करते. नुकत्याच झालेल्या छिद्राच्या बाहेर ओली विष्ठा असते. कांडी किडीमुळे उसाच्या कांड्या आखूड व बारीक होतात. 
जीवनक्रम : 
अंडी – 
या किडीची अंडी पानाच्या दोन्ही बाजूस मध्यशिरेलगत आढळतात. नुकतीच दिलेली अंडी ही चपट, अंडाकृती, चमकदार व पांढरी मेणचट असतात. एक मादी पतंग जास्तीत जास्त 414 अंडी देते. या किडीची अंडी अवस्था चार-पाच दिवस राहते. 
अळी : 
नवीन अळी सुरवातीस पानांवर साधारणत: एक तास फिरते. त्या वेळेस ती वाऱ्यामार्फत आजूबाजूच्या उसावर जाते. ज्या अळी खाली पडतात, त्या नष्ट होतात. ही कीड निशाचर असल्यामुळे व प्रकाशमान जास्त न मानवल्यामुळे उसाच्या पोंग्यात अथवा पानांच्या बेचक्‍यात निवाऱ्यासाठी जाते. पहिल्या व दुसऱ्या अवस्थेची अळी पानांच्या पेशीवर जमतात. तिसऱ्या अवस्थेपासून ही अळी उसाच्या काडीला छिद्रे करते. अंड्यातून नुकतीच बाहेर पडलेली अळी पोंग्याच्या पानांच्या पेशी खरडून काढते. त्यामुळे पाने उघडी झाल्यावर पांढरे पट्टे दिसून येतात. नंतर अळी उसाच्या वरील कोवळ्या कांड्यांना नुकसान करते. कमी वयाच्या उसात विशेषत: खोडवा पिकात कांडीकिडीमुळे नुकसान जास्त स्वरूपात होते. अशावेळेस पोंगामर सुद्धा आढळून येते. हा पोंगा सहजासहजी ओढून काढता येत नाही व याचा उग्र, सडल्यासारखा वासदेखील येत नाही. अळी ही शक्‍यतो खालून वरच्या दिशेला कांडीतून गोलाकार शिडीसारखी खात जाते व तिची विष्ठा छिद्राबाहेर टाकत जाते. ही अळी साधारणत: 1.6 ते 4 कांड्या पोखरते. क्वचितप्रसंगी नऊ कांड्यासुद्धा पोखरते. प्रादुर्भाव झालेल्या कांडीला खालच्या बाजूस डोळा फुटतो. या किडीमुळे उसाच्या वजनात 10.7 टक्‍क्‍यांपर्यंत घट येऊ शकते. उसाच्या कांड्यांना नुकसान झाल्यास उसाच्या रसाची प्रतवारी खराब होते. 
कोष : 
कोषात जाण्याअगोदर अळी बाहेर येते व अर्ध वाळलेले पानाखाली बेचक्‍यात चंदेरी आवरणात कोषामध्ये जाते. ही अवस्था पाच-12 दिवस राहते. 
पतंग : पतंग सकाळी लवकर कोषातून बाहेर पडतात. मादी पतंग दोन-तीन समांतर ओळीत, हिरव्या पानांच्या दोन्ही व मध्यशिरेला समांतर अशी पुंजक्‍यात अंडी घालतात. 
यजमान वनस्पती : ज्वारी, भात इ. 
लक्षणे/ नुकसान : 
1) किडीचा प्रादुर्भाव मे ते सप्टेंबर महिन्यांत मोठ्या प्रमाणात आढळतो. 
2) पूर्व हंगामीपेक्षा आडसाली लागणीस जास्त प्रादुर्भाव आढळतो. 
3) ऑक्‍टोबरमध्ये पडणाऱ्या पावसामुळे या किडीस जास्त पोषक वातावरण असते. 
4) जास्त तापमान, कमी आर्द्रता व कमी पाऊस यामुळे या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. 
5) या किडीचा प्रादुर्भाव कांडी तयार झाल्यापासून ऊस तोडणीपर्यंत आढळतो. 
6) या किडीमुळे उसाची वाढ कमी होते. कांड्या लहान राहतात व उसास पांगशा फुटतात. 
7) या किडीची अळी उसाच्या एक ते तीन कांड्यांचे नुकसान करते. उसाच्या सुरवातीच्या काळात या किडीची नुकसानीची तीव्रता कमी असते. मात्र नंतर ती वाढत जाते. 
8) या किडीमुळे 35 टक्‍क्‍यांपर्यंत ऊस उत्पादनात तर 2.9 ते 3.0 टक्के साखर उताऱ्यात घट होते. 
9) खाली पडलेला व पाणथळ जागी असलेल्या उसात या किडीचा प्रादुर्भाव खूप प्रमाणात वाढते. 

नियंत्रण : 
1) जैविक नियंत्रण : 
परोपजीवी कीटक जसे ट्रायकोग्रामा व टेलेनीमस हे कांडी किडीच्या अंड्यावर; ऍपेन्टेलिस आणि गोनिओझम हे अळीवर; टेट्रॅस्टिकस हे या किडीच्या कोषांवर जीविका करतात. कॅम्पोनोटस कॉम्प्रेसस हे अंडी व अळी अवस्था खातात. तसेच शेतातील काही मुंग्या व कोळी या किडीची अंडी साधारणतः 17 टक्‍क्‍यांपर्यंत फस्त करतात. जरी या किडीवर अनेक परोपजीवी व परभक्षी कीटक आढळून येत असले तरी शेतामध्ये या किडीच्या नियंत्रणासाठी सदरील घटक पुरेसे नाहीत. 
2) मशागतीय नियंत्रण : 
* कीडविरहित बेण्याची लागण करावी. 
* जास्त प्रादुर्भाव असलेल्या शेतात पाच, सात व नऊ महिन्यांत खालील पाने काढून टाकावीत. 
* जास्त नत्रयुक्त खते टाळावीत. 
* पाणथळाच्या ठिकाणी पाण्याचा योग्य तो निचरा करावा. 
3) या किडीमुळे जास्त प्रादुर्भाव झालेल्या उसाचा खोडवा घेण्याचे टाळावे. 
4) खूप प्रादुर्भाव झालेल्या शेतात भात, भाजीपाला, तेलबिया यांसारखी फेरपालटाची पिके घ्यावीत. 
5) ऊस लागवडीनंतर चार महिन्यांनी 15 दिवसांच्या अंतराने पाच ते सहा ट्रायकोकार्ड प्रति हेक्‍टरी अशा प्रमाणात ऊस तोडण्यापूर्वी एक महिन्यापर्यंत वापरावीत. 
6) दाणेदार क्विनॉलफॉस हेक्‍टरी 20 किलो याप्रमाणे जमिनीत टाकावे. 
7) हेक्‍टरी फवारणीसाठी 2.5 लिटर क्‍लोरपायरिफॉस (20 टक्के) प्रति 1000 लिटर पाण्यातून जमिनीत वाफसा आल्यावर सरीमधून द्यावे. 

डॉ. एम. पी. बडगुजर, डॉ. एस. एम. पवारसंपर्क – 02169-265333 (लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

Related Posts