ऊस शेती

ऊस पिकाचे आपत्कालीन व्यवस्थापन

   ऊस हे उष्ण कटीबंधातील पीक असल्यामुळे त्यास उष्ण हवामान, २० ते ३० सें. तापमान,      ८०-९०% आर्द्रता, प्रखर सुर्यप्रकाश, पुरेसे पाणी पोषक असते; तथापी कडक उन्हाळा, तसेच पाऊस काळातील कमी/नगण्य पाऊसमान यामुळे ऊस पिक वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. पिकाच्या काही महत्त्वाच्या शरीरक्रियाशास्त्रीय व जिवरासायनिक क्रियांवर परिणाम होवून बाष्पीभवनाचा वेग वाढतो व पेशी अंतर्गत पाण्याचा ताण निर्माण होतो. प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते. त्यामुळे या काळात योग्य व्यवस्थापन केले नाही तर उत्पादनात १५ ते ५० इतकी लक्षणीय घट येते.

आपत्कालीन परिस्थितीत उसावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

  1. ऊस पिकासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर शेतक-यांनी ठिबक अथवा तुषार सिंचन किंवा रेनगन पाणी व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
  2. को ८६०३२, कोएम ०२६५ व को ७४० हे वाण इतर जातींपेक्षा पाण्याचा ताण सहन करतात. त्यामुळे नवीन लागवडीसाठी अशा जातींचा प्राधान्याने वापर करावा.
  3. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे अशा ठिकाणी यापुढे पाणी देताना एक आड सरीतून पाणी द्यावे.
  4. पाण्याचा ताण पडत असल्यास ऊस पिकातील खालची पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावी. जेणेकरुन पाण्याचे वाष्पीभवन कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
  5. पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास लागणीनंतर ६०, १२० आणि १८० दिवसांनी २ % म्युरेट ऑफ पोटॅश व २ % युरीया यांचे मिश्रण करुन पिकावर फवारणी करावी.
  6. पाण्याची कमतरता असल्यास बाष्पीभवन कमी करण्यासाठी ६ ते ८ % केवोलीन या बाष्परोधकाची फवारणी करावी.
  7. पाण्याची कमतरता असेल अशा ठिकाणी नेहमीच्या पाटाने पाणी देण्याच्या पध्दती ऐवजी सुरुवातीस खर्चिक असली तरी ठिबक जलसिंचन पध्दतीचा वापर करावा.
  8. ऊस पिक हे तण विरहीत ठेवावे. त्यामुळे उपलब्ध पाण्यासाठी होणारी स्पर्धा कमी होवून ऊस वाढीसाठी उपयुक्त ठरेल.
  9. शेताच्या सभोवती उंच व जलद वाढणारी शेवरीसारखी पिके लावावीत.
  10. लागवडीच्या ऊस पिकात तसेच खोडव्याच्या पिकास हेक्टरी ५ ते ६ टन पाचटाचे आच्छादन करुन प्रति टन पाचटासाठी ८ किलो युरीया, १० किलो सिंगल सुपर फॉस्पेट व १ किलो पाचट    कुजविणा-या जिवांणूचा वापर करावा.

Related Posts